मुंबई : देशात सण उत्सावाचं वातावरण सुरू आहे. लोक सणासुदीसाठी खरेदी करण्यात गुंतलेले आहेत. अशावेळी डोक्याला ताप देणारी बातमी येऊन धडकली आहे. देशात पुन्हा एकदा साखरेचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या किचनचं बजेट बिघडणार आहे. केवळ गेल्या सहा दिवसातच देशातील प्रमुख राज्यांमध्ये साखरेचे भाव १३ ते १७ टक्क्याने वाढले आहेत. या सीजनमध्ये घरांपासून मिठाईच्या दुकानापर्यंत सर्वत्र साखरेची मोठी मागणी आहे. पण बाजारात साखरेचा पुरवठा अत्यंत कमी होत आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी यामुळे साखरेचे भाव गगनाला भिडले असल्याचं सांगण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशात ६ ऑक्टोबरचे एक्स मिल रेट ४,६०० रुपये प्रति क्विंटल होते, ते आता १२ ऑक्टोबर रोजी १३ टक्क्याने वाढून ५,२०० रुपयांवर गेले आहेत. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, महाराष्ट्रातही काहीशी अशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात साखरेचे भाव १७ टक्क्याने वाढले आहेत. महाराष्ट्रात साखरेचा भाव ५,१०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. सणातील मागणीच्या तुलनेत साखरेचा पुरवठा अत्यंत कमी होत असल्याने साखरेचे भाव वाढल्याचं स्थानिक व्यापार्यांचं म्हणणं आहे.
बाजारात कमतरता का?
कृषी तज्ज्ञ जी. के. सूद यांच्या मते, देशात पुरेशी साखर उपलब्ध नाहीये. दिलासा देण्यासाठी बाजारात अतिरिक्त ३ टन साखर आणण्यात आली होती. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. याशिवाय स्टॉक जमा करण्यास घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे ट्रेडला मोठा फटका बसला आहे. साधारणपणे साखर कारखाने दरवर्षी लवकर गाळप करतात. पण यावेळी गाळप हंगाम लवकर सुरू झालेला नाही. महाराष्ट्र, कर्नाटक सारख्या मोठ्या उत्पादक राज्यांमध्ये अजून ऊसाचं पीक कापणीसाठी तयार नाहीये. त्यामुळेच साखर बाजारात येण्यास उशीर होत आहे, असं सूद यांनी सांगितलं.
सरकारच्या कार्यवाहीचं काय झालं?
साखरेचं संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावलं उचलली होती. बजाारात सप्लाय वाढवण्याच्या हेतूने सरकारने १० लाख टन कच्ची साखरेच्या ड्युटी फ्री आयातीला मंजुरी दिली होती. सोबतच डिलरांवर स्टॉक लिमिटची कठोर मर्यादा लावली होती. बल्क कंझ्युमरलाही खुल्या बाजारातून थेट साखर खरेदी करण्यावर बंदी घातली होती. तसेच साखरेची साठेबाजी करण्यावरही बंदी घालण्यात आली होती. एवढे सर्व निर्बंध लावल्यानंतरही सरकारला कोणताही दिलासा मिळताना दिसत नाहीये. एका सरकारी अधिकार्याने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या आधी साखरेचे भाव आणखी उसळण्याची सरकारला भीती आहे.